सिया के राम ! की सियासत के ?

          जय जय श्रीराम ! कधी नाही पण आज सकाळी सकाळी ५ वाजता अचानकच मला दचकून जाग आली. कारण मला स्वप्न हि तितकंच अचंबित करणारं पडलं होत, आपणा सगळ्यांंचा आदर्श प्रभू श्रीरामचंद्र कोर्टाच्या बाहेर  ताटकळत उभा असून निकालाची वाट पाहतो आहे असं चित्र मला दिसत होतं आणि न्यायालयाच्या दुसऱ्या बाजूला हातात भगवे झेंडे घेऊन न्यायालयाच्या निकालाच स्वागत(कि अवमान?) करण्यासाठी रांगडी आक्रमक पोरं उभी आहेत. सगळ्यांचा एकच जयघोष अख्खा आसमंत दुमदुमून सोडतो आहे. बोलो बोलो जय श्रीराम ! जय जय श्रीराम ! खरे तर श्रीराम ह्या तिनाक्षरी शब्दात एवढी ताकद आहे की कदाचित मी ह्याच कारणामुळे झोपमोड होऊन उठलो असेल. शेवटी स्वप्न ते स्वप्नच. ते बऱ्याचदा काल्पनिकच असतंय. खरे तर रात्री झोपायच्या आधी मी टेलिव्हिजन वरचा विध्वंसक वाद पहिला होता. ह्याच कारणामुळे डोक्यात सगळा कचरा भरल्या गेल्यामुळे सकाळी स्वप्न पडले असेल यात शंका नाही. पण आता उठलो आहोतच तर किमान ज्या विषयावर स्वप्न पडलंय त्या विषयावर एक नागरिक, हिंदू, हिंदू-शेतकरी ह्या दृष्टीने म्हटलं विचार करूयात. मुळात मुद्दा उपस्थित होतो तो परकीयांच्या आक्रमणावरून, ही आक्रमणे धार्मिकच (जितेंद्र आव्हाडांच्या नादी लागून मी ह्या आक्रमणाला राजकीय म्हणणार नाही) होती असंच माझंही मत आहे. आता थोडं पटपट पुढे जाऊयात. त्या परकीयांनी काही शतकांपूर्वीच अयोध्येतले जे काही आपल्या आस्थेचे अवशेष होते ते नष्ट केले. मग आता हिंदूंच्या अस्मितेला धक्का वगैरे हा राजकीय स्वार्थापोटी निघालेला विषय आहे. कारण एवढं सगळं होऊन सुद्धा आजही 'काही' मुस्लिम बांधवांना अयोध्येत राम मंदिर व्हायला हवं असं वाटतंच याचं एक मुख्य कारण म्हणजे तेही रामाला आदर्श म्हणून मानतात. ती हिंदूंसाठी जमेची बाजू. राजकीय विषयांवर बोलत असताना एक गोष्ट कळते ती हि तथाकथित हिंदुत्ववाद्यांची जन संघ, जनता पक्ष आणि मग भारतीय जनता पार्टी एवढा प्रवास करत असताना बरीच दशके ओलांडली गेली. पण त्या वेळचे जे काही राजकीय विचारधारेची निर्मिती करणारे विचारक असतील त्यांनी हि एक गोष्ट फार चटकन ओळखली ती हि कि, हिंदूंमध्ये साधू, संत, भिक्खूंकडे फार आस्थेने पाहिलं जातं आणि ते जे प्रबोधनपर प्रवचने देतात ते लोक आतुरतेने ऐकतात आणि अंमलात आणतात. स्वातंत्रोत्तर काळात ह्याच साधू संतांनी प्रवचने, सत्संग, संगीत रामायणे यांच्या जोरावर रामाबद्दल बरीच जनजागृती केलेली आपल्याला पहायला मिळते. ह्या सगळ्या प्रबोधनाने सर्वसाधारण हिंदूंचं चांगलंच डोकं धुतलं होतं(ब्रेन वॉश) असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. त्यांनी काही चूक काम केलं असं मी म्हणणार नाही उलट चांगलंच केलं. कारण रामासारखं मर्यादा पुरुषोत्तम व्यक्तिमत्व असलेलं राष्ट्रीय प्रतीक त्यांनी तयार केलं. जो तो रामासारखा होऊ पाहत असतो ह्याच कारण राम आपले आदर्श आहेत ह्यात शंका नाही, हा आदर्श खरे तर साधू संतांनी प्रचलित केले असं म्हणायला पूर्णतः आधार आहे, मुळात एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या चांगल्या कामाचा, गुणांचा प्रचार प्रसार करणे योग्यच, त्याच्याने समाजाला योग्य दिशा मिळते. म्हणजे थोडक्यात काय तर रामाच्या सद्गुणांना तळागाळात ह्या संत समुदायाने पोहोचवून  देशकार्य केलं असं म्हणणे योग्य आहे कारण संतांचा हेतू पवित्र होता यात शंका नाही. पण दुसरीकडे राजकीय पक्ष मात्र भारतीय जनमानसाकडे तिरक्या नजरेने पाहत होते. आणि बरोबर रामाच्या सहानुभूतीचा विषय एका विशिष्ट टोकाला पोहोचला आणि त्याच वेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या काही कट्टरपंथी हिंदू संघटनांनी वेगळी रणनीती आखली असावी आणि त्याला त्यांच्याच सहसंघटना जसं विश्व हिंदू परिषद असेल किंवा आणखी काही यांनी फार मदत केली. मग हळू-हळू राम ह्या विषयाचं रूपांतर हिंदू-मुस्लिम वादविवादात होऊं लागलं आधी कधीतरी फक्त मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखला जाणारा विषय हळू-हळू बुद्धिभेदाचं कारण होत गेला, हे विषय नेमकं कोण पेरत होतं हे ठरवायची जबाबदारी मी आपणावर सोडेन. 
          बऱ्याचदा राजकीय पक्ष हे वेगवेगळ्या मुद्द्यांचा शोध घेत असतात शिवाय त्यांना त्यांचं राजकीय दुकान चालवायचं असतं. आणि हेच त्या वेळचे संघपरिवारातली माणसं करत होती. बऱ्याचदा संघाच्या विविध संघटना एकमेकांविरुद्ध मुद्दामच भांडण करत असताना दिसतात खरे तर हे मृगजळ असत, आतून सगळं आलबेल असतंय. त्याचं एक छोटस उदाहरण मी देऊ इच्छितो, मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी केलेली कर्जमुक्तीची घोषणा ते पूर्ण करू शकले नाहीत म्हणून त्यांचंच विंग म्हणून किसान परिषदेने दिल्लीत आंदोलन केलं. म्हणजे काय तर, 'मैं तुम्हे डाटूंगा और तुम रोनेका बस नाटक करते रहना' सगळं आतल्या आतच ठरलेलं. मूळ विषयाकडे वळूयात, तो हा कि देशातल्या बहुसंख्य हिंदूंची अस्मिता लक्षात घेता त्याला राजकीय रंग देऊन लगेचच भांडवल करण्यात आलं. सगळीकडून राम मंदिरासाठी वातावरण निर्मिती झाली. बाबरी मजिद सुद्धा पडली(पाडली?), सत्ता देखील आली. पण राम मंदिर बांधल्या गेलं नाही. मुळात हा विषय अलाहाबाद(प्रयागराज) उच्च न्यायालयाने हिंदूंकडून निकाल दिल्याने पुन्हा त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. आणि झालं ! न्यायालयात आपले प्रभू श्रीराम टांगले गेले. म्हणजे प्रभू श्रीराम मंदिराचा मुद्दा टांगलाच जायला हवा हि तथाकथित उजव्या कट्टर लोकांची भूमिका असावी असं मला स्पष्ट जाणवतं, कारण त्यांनी ठरवलं तर कायदा सुद्धा होऊ शकतो पण कायदा करून, मंदिर बांधून झालं तर पुढच्या निवडणुका कोणत्या मुद्द्यांवर करायच्या हा मोठा गहण प्रश्न त्यांना पडला असेल. मधल्या काही काळात सर्वोच्च न्यायालयाने हिंदू-मुस्लिम दोघांनी वाटाघाटी करून हा मुद्दा सोडवा असा निर्वाळा दिला असताना सुद्धा दोन्ही याचिकाकर्ते म्हणजे तथाकथित मुस्लिम कट्टरपंथीय आणि हिंदू कट्टरपंथीय, समाजाच्या कल्याणाच्या विषयात जवळ येऊ शकले नाहीत हे दुर्दैव इथल्या भारतीय नागरिकाचं आहे. मला प्रश्न एवढाच पडतो कि एखादा मुद्दा सलग तीन राजकीय पिढ्या कशा काय पुरवू शकतात ? ह्यालाही कसब लागत बुवा ! ज्यांनी बिचाऱ्यांनी आंदोलने केलीत, रथयात्रा काढली त्या प्रवीण तोगडिया आणि लालकृष्ण अडवाणींना मातीमोल तर केलंच पण आणखी तिसरी पिढी हि ब्राम्हणवाद जोपासणारी मंडळी(ब्राम्हण समुदाय नाही) खाऊ पाहत आहे. आपण ब्राम्हणेतर हिंदू नेमकं हुशार कधी व्हायचं मग. मुळात मला एक गोष्ट कळते ती हि कि कृष्ण जो द्वारकाधीश नावाचा राजा होता त्यालाही यांनी विष्णूचा अवतार म्हटलं, राम जो अयोध्येचा राजा होता यालाही यांनी विष्णूचा अवतार म्हणून काल्पनिकतेची किनार लावली नंतर वेळ आली आमच्या बुद्धांची, म्हणे सिद्धार्थ गौतम  बुद्ध सुद्धा विष्णूचा नववा अवतार, शिवछत्रपती सुद्धा देवाचा अवतार मग मला एक सांगा हे आपली दिशाभूल करत नाहीत का. मुळात वर उल्लेखिलेली मंडळी आपल्यासारखीच खरीखुरी हाडामांसाची बनलेली माणसे होती ते काय आभाळातून आलेले नव्हते. त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाच्या बळावर स्वतःची जनमानसात एक छाप सोडली होती जी नंतर ब्राम्हणवादी मंडळीला पुसायला जड जायला लागली म्हणून लगेचच ते विष्णूचा अवतार म्हणून ठरवले गेले. इथे मला माझ्या एका मित्राने सांगितलेली गोष्ट ठळक आठवते तो ब्राम्हण आहे पण ब्राम्हणवादी नाही हे इथे नमूद केले पाहिजेच. त्याच्या शब्दात सांगायचं झालं तर, 'अरे गाय वगैरे बद्दल यांना आस्था नाहीच रे, हे तर मतांचं विभाजन करायची ट्रिक आहे, उद्या एखाद्या मोठ्या समुदायाने जर सशाला देव मानायला सुरुवात केली तर हे सशाला पण अडॉप्ट करतील आणि सशाचं मंदिर बांधतील' यावरून एक गोष्ट ठळक कळते ती ही की राम आपला आदर्श आहे तसेच शिवछत्रपती सुद्धा आहेत, चंद्रगुप्त, सम्राट अशोक सुद्धा आहेत. आणि जर ह्या आदर्शांचं सुद्धा रामाइतकंच जर उदात्तीकरण झालं तर ते(तथाकथित राजकारणी-समाजकारणी) रायगड ला महाराष्ट्राची राजधानी आणि पाटलीपुत्र ला देशाची राजधानी करायची मागणी करू शकतात तेव्हा आपल्यालाच आश्चर्य वाटायला नको. ही अतिशयोक्ती ज्यांना वाटत असेल त्यांना एक छोटसं उदाहरण मी इथे देणार आहे ते असं की मला एक गोष्ट गेल्या एक वर्षात जाणवली ती ही की भीमा कोरेगाव दंगलीच्या आधी कधीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती प्रित्यर्थ पथसंचलन काढलेलं मला आठवत नाही. मग भीमा कोरेगाव झाल्यावरच का जयंतीनिमित्त पुण्यात पथसंचलन. म्हणजे काय तर दलित समाज आक्रमक व्हायला लागला की लगेच त्यांना गोंजारण्याचा प्रयत्न करायचा आणि एरव्ही फक्त दसऱ्याला निघणारं पथसंचलन चक्क भीम जयंतीला सुद्धा. म्हणजे ही लवचिकता फक्त आणि फक्त सत्ता प्राप्तीसाठी आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. थोडक्यात काय तर मृताच्या टाळू वरचं लोणी खाणारी ही माणसं आपण वेळीच ओळखली पाहिजेत. म्हणजे नेहमी शांत राहायचं आणि लोकसभा निवडणुका जवळ आल्या की लगेच राम मंदिर, गोहत्या सारखे मुद्दे पेटवून देशात अराजक माजवून दुफळी निर्माण करायची आणि ब्राह्मणेतर बहुजनांच्या पोरांना पेटवून त्यांची मस्तके हस्तक करून हवं तिथे दंग्यांसाठी वापरायचं आणि आणखीनच बेरोजगारी वाढवत न्यायची. त्यांची पोरं मात्र एम.पी.एस.सी.,यु.पी.एस.सी. आणि सी.ए. होणार आम्ही बरे आहोत हुजरेगिरी करायला, चटया उचलायला आणि आणखीन बरंच काही.
          मध्यंतरीच्या काळात एक वेगळीच गोष्ट मला ऐकायला मिळाली की रावणाला इथला दलित समुदाय आपला पूर्वज मानतोय म्हणे. आपल्या त्या भोळ्या बांधवांना जाऊन सांगा कुणीतरी की रावण तर गर्विष्ठ ब्राम्हण होता, आपला पूर्वज म्हणजे तो धनुर्धारी, शिकार करणारा शिकारी, न्याय प्रस्थापित करणारा 'राम' आहे. ज्याने एक सामान्य मनुष्य असून सुद्धा असामान्य अशा दुष्ट रावणाचा वध केला. आपल्या आपल्यात आणखी किती बुद्धिभेद होऊन वेगळे होणार आहोत आपण ! कुठे तरी हे थांबलं पाहीजे आणि थांबवलं पाहिजे. आणि हो जरा गोहत्येबद्दल पण बोललं पाहिजेच. वाचकांनो मला एक सांगा गोहत्या बंदीचं नेतृत्व करणारे किती लोक गाई पाळतात हो. अहो गाईची खरी सेवा तर इथला सर्वसाधारण भोळा हिंदू शेतकरी बळीराजा करतोहो पण त्याबद्दल चकार शब्द सुद्धा कुणी काढायला तयार नाही. एखाद्या दिवशी गाय माय बिचारी आजारी जरी पडली ना तरी तो अक्षरशः रडवेला होऊन जातो. आणखी किती भक्ती असायला पाहिजे गाई प्रती. पण काही दळभद्रींना गाईवर फक्त राजकारण करायचं असल्या कारणाने तो मुद्दा ते शांत होऊ देत नाहीत. शेवटी राजकारण करत असताना मुद्दे पण पाहीजेत ना कारण रस्ते, वीज, पाणी, रोजगार ह्या सगळ्या गोष्टी आताच्या सत्ताधाऱ्यांनी आणि त्यांच्या आधीच्या सत्ताधाऱ्यांनी कधीच सोडवून टाकल्या आहेत. जिकडे तिकडे आज बघितलं तर सुजलाम् सुफलाम् झालेलं असल्याकारणाने आणि दुष्काळ वगैरे सारखी परिस्थिती नसल्याकारणाने ह्या विषयांवर बोलण्यासारखं आता काहीच नाहीये म्हणून राम मंदिर, गोहत्या, बाबरी अशा विषयांवर बोलणं भाग आहे.
          मागे मागे गुजरात मध्ये पटेल समुदायाचं आंदोलन पेटलं होतं आता गुजरात मध्ये पटेल मतपेटी स्वतःजवळ राखण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून स्मारक बांधल्या गेलं. माझा स्मारकाला अजिबातच विरोध नाही पण माझं लिखाण हे 'प्रासंगिकते'वर आहे. म्हणजे ऐन निवडणुकीच्या आधीच यांना हे कसं बरं सुचतं याची मला कल्पना करवत नाही. महाराष्ट्रात सुद्धा विधानसभेच्या आधी शिवस्मारकाची घोषणा ह्याच घटनेची प्रचिती आणून दिल्यावाचून राहत नाही. जर यांना एवढाच वैचारिक पुळका आहे तर मग सरदार जिवंत असताना बरं त्यांना समर्थन किंवा त्यांच्या देशभक्तीचा वाटा तत्कालीन सरसंघचालकांनी उचलला नाही. सुभाष बाबूंबद्दल सुद्धा हेच, आज मरणोत्तर त्यांच्या कार्याचा गवगवा केला जातोय मग ते जिवंत असताना त्यांच्या फौजेत संघाची लोकं का सामील झाली नाहीत याची उत्तरं आता सामान्य माणूस विचारल्याशिवाय राहणार नाही.
          आता थोडक्यात वळूया देशाच्या लाडक्या राहुलजींकडे, अधून मधून त्यांनाही हिंदुत्वाचे झटके येतात, शेवटी जवळपास शंभर कोटी हिंदू ना आम्ही. मग मतपेटी म्हणून त्यांनी न पाहिलं तर नवलच. अलीकडे 'जनेऊधारी पंडित राहुल गांधी' म्हणून आवई उठवली जातेय, साहेब बऱ्याच ज्योतिर्लींगाना भेट देऊन साष्टांग नमस्कार सुद्धा घालून आलेत म्हणे. पण एक कळत नाही जनेऊधारीच हिंदू का बनले ते ? इतर अठरापघड जातीतली शेतकरी पागोटे घातलेली माणसं काय हिंदू नाहीत होय ? मग कळत जातं की आम्हा बहुजन हिंदू शेतकऱ्यांच्या पागोट्याचं जानव्यासारखं ब्रँडिंग कुठं झालंय. जानवं ब्रँड झाल्यामुळे राहुल गांधी उद्या कुर्त्याच्या वरून जानवं घालून प्रचार करतील पण पागोटे घालणार नाहीत. मला खरे तर हिंदुत्वाच्या नावाखाली सर्रास ब्राम्हणवादाचं उदात्तीकरण दिसायला लागलंय आणि ही एकंदरीत सगळ्यांसाठीच धोक्याची घंटा आहे. उजव्या चळवळीत काम करणाऱ्या युवकांना मी आवाहन करेल की बाबाहो डोळे उघडे ठेऊन काम करा कारण भविष्यात तुमचा लालकृष्ण अडवाणी, प्रवीण तोगडिया, गोपीनाथ मुंढे, एकनाथ खडसे, केशव प्रसाद मौर्य कधी होईल सांगता येत नाही. हिंदुत्व हिंदुत्व करत करत हिंदुत्वाच्या चादरीखली ब्राम्हणवादाची काटेरी गादी तर नाही ना ?
हे जरा चाचपून पहा. जितका जिहाद, नक्सलवाद, माओवाद आणि आतंकवाद देशाच्या पतनाला कारणीभूत आहे तितकाच छुपा ब्राम्हणवाद सुद्धा देशाच्या आणि एकुणच इथल्या भोळ्या भाबळ्या जनतेच्या पतनाला कारणीभूत आहे. ते विष हळू-हळू पसरत जातं आणि आपला पाडाव कधी झाला ह्याचा थांगपत्ता सुद्धा लागत नसतो.
          अनुमानाकडे यायचं झालंच तर एक गोष्ट कळते ती ही आपण ज्या मातीमध्ये दिवसरात्र काबाडकष्ट करून अन्नधान्य पिकवतो त्या मातीला आपण आई मानतो आणि तिलाच आपण सीता माता असं सुद्धा म्हणतो, कारण सीता माता ह्या बालपणी त्यांच्या वडिलांना जमीन नांगरताना सापडल्या होत्या, ही आपली धारणा आहे. ह्या नात्याने सुद्धा राम आपला 'पितृ' आहे आणि त्याचा राज्याभिषेक झाल्यामुळे म्हणजेच इथल्या काळ्या मातीशी लग्न झाल्यामुळे सुद्धा प्रभू श्रीरामचंद्र आपले 'पिता' आहेत. ह्या भूमीवर ज्या ज्या कल्याणकारी चक्रवर्ती राजांचा राज्याभिषेक झाला ते ते आपले पूर्वज आहेत, पिताश्री आहेत कारण राज्याभिषेक होणं म्हणजे इथल्या धारतीशी लग्न लागणं आणि इथल्या प्रजेचा पिता म्हणून जबाबदारी स्वीकारणं. आणि राहिला विषय त्यांच्या राजकारभाराचा तर त्यांच्या आदर्शांचं अनुकरण केल्याने आपलं आणि आपल्या देशाचं हितच आहे. पण हे करत असताना आपल्या आस्थेशी खेळून तिचं कुणी भांडवल तर बनवत नाहीना याची काळजी आपण आपलीच घेतली पाहिजे. शेवटी सिया के राम ! की सियासत के ? हे आपण आपसुकच ठरवलेलं ठीक राहील...!

~भूषण महाजन 
(9860825840)
bhushanmahajan1496@gmail.com

टिप्पण्या

  1. मी आपला वास्तवतेवर आधारीत असलेला अभ्यासपूर्ण समाजहीतासाठी उपयोगी पडणारा लेख वाचला फारच छान व अंजन घालणारा आहे आपल्याला लिखाणाला सलाम व पुढील समाज हितासाठी लेखणाला शुभेच्छा व अभिनंदन

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मला प्रोत्साहन दिल्याबद्दल आपले मनापासून आभार...I will look forward for ur guidance.....!

      हटवा
  2. खूप खूप धन्यवाद सर...! जण जागृती हाच उद्देश होता आणि तो सफल झाला यात मला धन्यता वाटते...!

    उत्तर द्याहटवा
  3. तुझा हा लेख वाचुन फारच छान वाटल
    तुझ्या विषयी वाटनारा आदर अजून खुप
    वाढला...तुझा हया जनकल्याण कार्यामुले सर्वसामान्य जनतेचे डोळे उघडोत हिच प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना..

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपल्या सारख्या ज्ञानी माणसाला सुद्धा जर मला द्यायचा तो संकेत अगदी बरोबर कळला तर माझा लेखनप्रपंच सफल झाला असा म्हणायला काही शंका नाही.

      हटवा
  4. तुझा मित्र दुर्गेश अशोकराव पाटील

    उत्तर द्याहटवा
  5. दुर्गेश जी आपण नेहमीच मला मोठ्या भावाप्रमाणे आज पर्यंत मार्गदर्शन केले आहे. आजही आपण ती जबाबदारी यथायोग्य सांभाळत आहात ही बाब माझ्यासाठी फार समाधानाची आहे. धन्यवाद. मी आपला नेहमीच ऋणी आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायव्यवस्थेच्या भावी संरक्षकांवरच वेळोवेळी अन्यायसदृश्य परिस्थिती का ?

राफेलबद्दल बोलू काही ?